- मृत कर्मचाऱ्यांची कामगार कल्याण मंडळाकडे नोंद नाही
- विम्यासाठी नातेवाईकांची धावपळ
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. करोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कोविड ड्युटीवर नियुक्त आहे. आपले कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत सात महापालिका कर्मचाऱ्यांचा दुर्देवी अंत झाला आहे. कर्तव्यावर असताना करोना होऊन मृत्यू झाल्यास त्याची माहिती कामगार कल्याण मंडळाकडे देणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत फक्त एकाच मृत कर्मचाऱ्याची माहिती प्रशासनाने कामगार कल्याण मंडळाकडे दिली आहे. यावरून करोनासाठी दिवसरात्र झटून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांच्या मृत्यूनंतरही महापालिकेची उदासीनता कायम आहे.
शहरात दररोज सरासरी एक हजार रुग्णांची नोंद केली जात आहे. तसेच दिवसाला 15 ते 20 मृत्यू होतात. असे असताना महापालिका यंत्रणा पोलिस कर्मचारी करोनाला रोखण्यासाठी काम करत आहेत. महापालिका शिक्षक,डॉक्टर, परिचारिका, आया, सफाई कामगार हे जीवाची बाजी लावून करोनायुद्धात काम करत आहे. कोविडसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार करोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले आहे.
करोनामध्ये काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला विमा संरक्षण दिले जाते. यामध्ये महापालिकेच्या वतीने 25 लाख व केंद्र सरकारच्यावतीने 50 लाख असे 75 लाखांचे विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी दुर्देवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची माहिती कामगार कल्याण मंडळाकडे नोंदविणे आवश्यक आहे. मात्र याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागप्रमुखांची अनास्था असल्याचे समोर आले आहे. मागील दीड महिन्यामध्ये महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत फक्त एका कर्मचाऱ्याची नोंद कामगार कल्याण मंडळाकडे करण्यात आली आहे.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटी देण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका शिक्षकांचा समावेश आहे. तसेच आरोग्य, वैद्यकीय विभागाबरोबरच स्थापत्य, नगररचना, पाणीपुरवठा, विद्युत, सुरक्षा या विभागातील कर्मचाऱ्यांना कोविडचे काम देण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वैद्यकिय, शिक्षण, आरोग्य व सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. असे असताना आतापर्यंत फक्त एका मृत कर्मचाऱ्याची माहिती कामगार कल्याण विभागाकडे देण्यात आली आहे.
वारसाने नोकरी स्वीकारली तर 75 लाखांचा लाभ
यामध्ये वर्ग वगळता मृत झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी देण्यात येणार आहे. वारसांने नोकरी स्वीकारली तर 75 लाखांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तर नोकरी नको असेल तर एक कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
कोविडचे काम करत असताना करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला महापालिकेच्या वतीने 25 लाखांचे विमा कवच दिले जाते. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याची माहिती कामगार कल्याण मंडळाला द्यावी लागते. यासाठी आम्ही आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी यांचा समावेश आहे. यामध्ये केलेल्या तरतूदीनुसार मृत झालेला कर्मचारी मृत्यू होण्याआधी 14 दिवस कोविडड्युटीसाठी असणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. त्यांनाच विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
– चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त कायदा विभाग