पती-पत्नीस मारहाण : “आम्ही अनिल काशीद’ची माणसे असल्याचा आरोपींकडून उल्लेख
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नीस मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोघांवर ऍट्रॉसिटीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करीत दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गणेश उर्फ नाना दत्तात्रय फडतरे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) व विशाल आबा शिवले (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर साक्षी अमोल जाधव (रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास दौंड विभागचे अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करीत आहेत.
कोरेगाव भीमा येथे पुणे शहर पोलीस दलामध्ये मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अमोल जाधव व त्यांची पत्नी साक्षी जाधव हे वढू बुद्रुक येथे जाण्यासाठी आलेले असताना सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा चौकात थांबले होते. त्या ठिकाणी गणेश फडतरे आला आणि त्याने तुम्ही येथे थांबू नका येथून निघा चौक आमचा आहे, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळी साक्षी जाधव यांनी फडतरेस आम्ही बाहेरचे नाही येथीलच गायकवाड यांच्या घरातील असल्याचे सांगितले. फडतरेने साक्षी यांच्या वडिलांच्या नावे देखील शिवीगाळ केली. यावेळी फडतरेने “आम्ही अनिल काशीद’ यांची माणसे आहोत, असे म्हणून पती-पत्नीस मारहाण केली.
फडतरेने फोन करून विशाल शिवले यास बोलावून घेतले असताना साक्षी जाधव यांनी फोन करून त्यांच्या वडिलांना बोलावून घेतले.
दरम्यान, शिवलेने देखील त्यांना शिवीगाळ दमदाटी केली. काही वेळाने साक्षी यांचे वडील, चुलते त्या ठिकाणी आले असता फडतरेने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत धमकी दिली. काही वेळात शिक्रापूर ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फडतरेस ताब्यात घेतले. पुढील तपास दौंड विभागाचे अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करीत आहेत.