वडगाव हवेली -कोडोली, ता. कराड येथील ग्रामपंचायत करोना संसर्गाच्या संकट कालावधीत इन्फ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, फेस शिल्ड, पीपीई किटने सज्ज झाली आहे. करोना लढाईत नागरी आरोग्य केंद्राचे अचूक काम होणार आहे. हा अनोखा उपक्रम राबविणारी जिल्ह्यात कोडोली ग्रामपंचायत एकमेव ठरणार आहे.
याकामी वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शुभम जाधव व डॉ. विजय जगताप यांचे मार्गदर्शन तसेच गावचे सुपुत्र सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. जगदीश जगताप करोना लढाईत गावासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी हे सर्व साहित्य उपल्बध करून देण्यासाठी प्रयत्न केले. याकामी लागणारा खर्च ग्रामपंचायतीने उचलला आहे.
गावात आरोग्य केंद्र, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या 14 जणांचे पथक दररोज घरोघरी सर्व्हे करत आहे. या पथकाकडून सर्दी, ताप, खोकल्यासह सारीच्या रूग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत विविध सुविधा पुरवत असून नुकतेच डिजीटल थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पीपीई किट आदी सामुग्री देण्यात आली आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्राचे काम आणखी अचूक व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. कराडलगतच्या गावांमध्ये करोनाचे रूग्ण वाढल्यामुळे गावात दररोज घरोघरी सर्व्हे करून सर्दी, ताप, खोकल्यासह सारी रूग्णांची माहिती घेण्याचे काम आरोग्य केंद्रामार्फत सुरू आहे. याकामी 12 सेविका काम करत आहेत. यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. हे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन रूग्णांची माहिती घेत आहेत.
करोनाच्या संसर्गजन्य वातावरणात आरोग्यकर्मी गावात काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी त्यानुसार रूग्णाच्या अंगाला हात न लावता ताप मोजता येणारे 2 डिजीटल थर्मामिटर याचा उपयोग आरोग्य सर्व्हे करणाऱ्या पथकाला होणार आहे. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजणारे 2 ऑक्सिमीटरही ग्रामपंचायतीने खरेदी केले आहेत. ऑक्सिमीटरच्या आधारे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण लगेच कळणार असून, हे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या रूग्णावर अधिक लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.
सर्व्हे करताना तापाचे रूग्ण आहेत का? याची माहिती विचारण्यात येत होती. आता थेट थर्मामीटरच्या सहाय्याने तातडीने ताप मोजणे शक्य होणार आहे. तर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रूग्णाला हात न लावता त्याचा ताप मोजता येणार आहे. यावेळी सरपंच सूर्यकांत सुतार उपसरपंच घनश्याम जगताप, पोलीस पाटील सुधाकर जगताप, सदस्य भरत जगताप, तसेच दक्षता कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उपस्थित होते.