आज आपला देश स्वातंत्र्यांची पंचाहत्तरी गाठतो आहे. आजच्या या मंगलप्रसंगी आपण एका अशा स्वातंत्र्यसैनिकाबद्दल वाचणार आहोत, जे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात लढले, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी झुंजले…ते होमगार्डही होते…ते एनसीसी ऑफिसरही राहिले आहेत…त्यांनी अनेक होतकरू तरुणांना व्यवसायासाठी मार्गदर्शनही केले…ते शिक्षकही आहेत..त्यांनी स्काऊट गाइड चळवळही चालवली…ते आयुर्वेदाचेही तज्ज्ञ आहेत..होय, आपण अशा अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाबद्दल वाचत आहोत…ज्यांचे नाव आहे डॉ. अवधुतराव शंकरराव डावरे…देशाच्या आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे एक चालते-बोलते विद्यापीठ म्हणून डॉ. अवधुतराव डावरे आजोबांची ख्याती आहे.
“स्वातंत्र्य’ हा एक असा शब्द आहे, जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचारतो..तो लढा पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचे गौरवगाण सांगतो…आणि पोलादी छाती करून संकटावर पाय देऊन उभे राहण्याची प्रेरणा देतो. या लढ्यात अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेवत आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली, अशाच महनीय व्यक्तीमत्त्वांच्या श्रृंखलेत डॉ. अवधुतराव डावरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
डॉ. अवधुतराव डावरे यांचा जन्म दि. 1 फेब्रुवारी 1928 चा. प्राथमिक शिक्षण परभणी जिल्ह्यात झाले. याच काळात वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत उडी घेतली. सन 1938 ते 1947 या काळात चाललेल्या “भारत छोडो’ चळवळीतील विविध कार्यांत ते सहभागी होते. सन 1942च्या “चले जाव’ आंदोलनातही डॉ. डावरे अग्रणी होते. शिवाय, विदेशी वस्त्राची होळी, झेंडा सत्याग्रहातही त्यांनी सहभाग घेतला.
या सर्व आंदोलनांदरम्यान डावरे आजोबांनी परदेशी वस्तूंची होळी करणे, परदेशी मालावर बहिष्कार टाकणे, सत्याग्रह घडवून आणणे, सरकारी इमारतींवर झेंडा फडकावणे, झेंडा सत्याग्रह, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, एस.पी. ऑफिस आणि कारगृहांवर तिरंगा ध्वज फडकावणे यात सहभाग घेतला. यात त्यांनी 2 वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली होती आणि विशेष म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी त्यांची सुटका झाली होती.
एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळत असताना, मराठवाडा मात्र अजूनही निजामाच्या ताब्यात होता. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यापाठोपाठ डावरे आजोबांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात उडी घेतली. या काळात त्यांच्यावर पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. पण, अशाही स्थितीत त्यांनी आपले मातृभूमी रक्षणाचे कार्य सुरूच ठेवले. यात सत्यागृह घडवणे, जंगल सत्यागृहात सहभाग, रेल्वे रोखण्यासाठी सिग्नल बंद पाडणे, तारा तोडणे यात अशी क्रांतिकारी कार्ये केली.
निजाम राजवटीतील सिंधीची झाडे तोडून मालगुजारी घटवणे, गावे स्वतंत्र करणे, महिलांची अब्रु राखणे, गावे स्वतंत्र करणे, निजामाचे पोस्ट ऑफिस-नाके जाळणे यात डावरे आजोबा अग्रभागी होते. निजाम पोलीस आणि रझाकारांशी त्यांनी दिलेल्या सशस्त्र लढ्याबद्दल त्यांचा ताम्रपटाने गौरव करण्यात आला आहे. शिवाय, परभणी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या पुस्तकात अवधुतराव डावरे यांचे नाव गौरवाने प्रकाशित करण्यात आले आहे.
अवधुतराव डावरे यांना पूर्वीपासूनच शिक्षण क्षेत्राची आवड होती. त्यामुळे भविष्यात शिक्षकी पेशा स्वीकारून राष्ट्रउभारणीत योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्याप्रमाणे त्यांनी हिंदी भाषेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत सन 1950 ते 1956 या काळात हैदराबाद येथे आणि सन 1956 ते 1968 दरम्यान परभणी येथे खासगी आणि शासकीय शाळांत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. शिवाय, 1962 ते 2001 या काळात परभणीत स्थापन झालेल्या होमगार्ड दलातही त्यांनी सेवा बजावली.
शिक्षण विभागात कार्यरत असताना श्री. डावरे आजोबांनी व्यवसाय मार्गदर्शक, राष्ट्रभाषा शिक्षक, सरकारी परीक्षा संचालक, जिल्हा परिषदेत इयत्ता चौथी, सातवी आणि आठवी बोर्डाच्या परीक्षा घेणे, सरकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक केलेल्या भाषा परीक्षेसाठी घेतलेले वर्ग, प्रौढ शिक्षण, रात्रशाळा, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिर, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया मोहिमांतही डॉ. डावरे कार्यरत राहिले आहेत.
विशेष म्हणजे, या कार्यासाठी श्री. डावरे आजोबांनी एक रुपयाही मानधन स्वीकारले नाही. तत्कालिन परभणी नगरपालिकेत अग्निशमन दल स्थापन करण्यात आले. त्यावेळी डॉ. डावरे यांनी पुढाकार घेत तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण दिले.
श्री. डावरे आजोबांनी हिंदी शिक्षक पात्रता पदवी आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानातून पटकावली. तर, हिंदी साहित्यात त्यांनी त्यावेळी विशारद मिळवले आहे. अलाहाबाद येथून हिंदी उत्तमा परीक्षादेखील ते उत्तीर्ण झाले आहेत. मिश्र आयुर्वेद वैद्य विशारद ही एमबीबीएस समकक्ष पदवी डॉ. डावरे यांनी नांदेड येथून पूर्ण केली.
त्यानंतर 1949 ते 1952 या काळात त्यांनी केशव स्मारक हिंदी विद्यालय, नारायणगुडा हैद्राबाद येथे शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. त्याचदरम्यान सरकारी शाळेत नियुक्तीसाठी भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्याने डावरे आजोबांची नियुक्ती शासकीय शाळेत करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी तेथील शिक्षकांसाठी भाषा विषयाचे मोफत वर्ग घेतले. त्यामुळे अनेक शिक्षक सेवेत कायम झाले. याच काळात श्री. डावरे यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरवही करण्यात आला आहे.
राष्ट्रसेवक आणि शिक्षक या कार्यासोबतच होमगार्ड म्हणून डावरे आजोबांनी उल्लेखनीय सेवा दिली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे 1962 ते 2001 या काळात आजोबा गृहरक्षक दलात होते. यात त्यांनी 1984 पासून कोणतेही मानधन न घेता सेवा दिली. इतकेच नव्हे, होमगार्ड असताना पुढे प्रत्येक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून पदोन्नती मिळवत आजोबांनी कंपनी कमांडरपर्यंत झेप घेतली.
याच काळात त्यांनी सर्व सण-उत्सव-प्रसंगांत बंदोबस्त, शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार, आपत्कालिन परिस्थितीत जीवाची बाजी लावत अनेक जीव देखील डॉ. डावरे यांनी वाचवले आहेत. यात कारेगाव ता. परभणी येथे एका घराची भिंत कोसळली असता, तेथील दोन व्यक्तींना जीवदान दिले. तर, मंठा येथे एका झोपडीस आग लागली असता, शेळीचे पिल्लू आणि एका छोट्या बाळाला वाचवून डॉ. डावरे यांनी आपले प्राणही पणाला लावले. अशीच बचावकार्ये त्यांनी मुंबई, पुणे, परभणी जिल्ह्यांत केली आहेत.
शिवाय, विविध स्पर्धांतही डॉ. डावरे आजोबांनी अव्वल क्रमांक पटकावत प्रशस्ती मिळवली आहे. यात वादविवाद स्पर्धा, रिव्हॉल्वर स्पर्धा, थ्री नॉट थ्री शर्यत, होमगार्डचे प्रशिक्षण यातही श्री. अवधुतराव डावरे अव्वल राहिले आहेत.
डॉ. डावरे यांनी केलेले कार्य, सेवा आणि राष्ट्रभक्तीप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचा विविध पातळीवर गौरव झाला आहे. तत्कालिन मंत्री नामदार धाबेकर, नामदार प्रकाशराव सोळंके, तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी डॉ. अवधुतराव डावरे यांचा सपत्नीक गौरव केला आहे.
सन 2017 मध्ये क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक डॉ. अवधुतराव डावरे आजोबांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
डॉ. अवधुतराव डावरे यांनी स्वातंत्र्य संग्रामात केलेले कार्य, मराठवाडा मुक्ती संग्रामात बजावलेली कामगिरी तर उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहेच…पण, येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी त्यांची वाटचाल गौरवाची आणि भूषणावह ठरणारी आहे.
स्वातंत्र्य सैनिकासह डावरे आजोबा शिक्षक, होमगार्ड, डॉक्टर, स्काऊट गाइड प्रशिक्षक, व्यवसायासाठी मार्गदर्शक अशा अष्टपैलू भूमिकेतून सदैव समाजाच्या प्रगतीसाठी- सुरक्षेसाठी झटत आहेत. आजच्या या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. अवधुतराव डावरे यांच्या कार्यास मानाचा मुजरा…