मुंबई – बिग बॉस मराठी फेम अभिनेता किरण माने विविध विषयांवर परखडपणे आपले मत व्यक्त करत असतो. यावरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील केली जाते. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आपले भूमिका सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सागर बर्वे या आरोपीबाबत पोस्ट लिहिली आहे. या आरोपीने किरण माने यांनाही अश्लील शब्दांत ट्रोल केले होते.
किरण माने यांची पोस्ट
मलाही तू अतिशय घाण, अश्लील शब्दांत ट्रोल केलं होतंस. एक वर्षाच्या आत सापडलास ! तुझं खरं नांव उघड झालेलं पाहून फारसं आश्चर्य नाही वाटलं. ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेक अकाऊंटमागे कुणीतरी भेकड माणूस असणार याची खात्री होती. पण माझा तुझ्यावर अजिबात राग नाही दोस्ता. उलट दया येते तुझी. तुला लहान भाऊ मानून तुझी समजूत काढावी वाटते.
गेले कितीतरी महिने, फेक अकाऊंटमागे लपून तू खूप लोकांच्या आईवडिलांचा अत्यंत बिभत्स, किळसवाण्या शब्दांत उद्धार केलास बर्वे. तुझ्यावर संस्कार करणार्या तुझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही. तुझ्या बहिणीही सुस्वभावी असणार. काय चूक यांची? काहीजण तुझ्या जातीवर जातील. पण जातीचा काय संबंध रे? भारतात प्रत्येक जातीत भेदाभेद टाळून मानवतेचा संदेश देणारे महामानव जन्मलेत. चूक असलीच तर तुझ्या सडलेल्या, नासलेल्या मेंदूंची आहे बर्वे. मेंदूचा उकिरडा झाल्यानंतर असल्या किळसवाण्या शब्दांची किड पैदा होते. आईवडिलांनी आशेनं तुझं नांव ‘सागर’ ठेवलंय, तू दुर्गंधी पसरवणारं फुटकं ड्रेनेज निघालास की रे.
अजूनही जागा हो माझ्या मित्रा. सोड हे फडतूस उद्योग. माणूसकी बाळग. आपण माणसं आहोत. मतभेद असतात. असावेत. भांडूया. वाद घालूया. पण आयाबहीणींची, त्यांच्या शरीरांची वर्णनं करून अत्यंत घृणास्पद शब्दांत लक्तरं का काढायची??? याला मी तरी घाबरत नाही हे नीट लक्षात ठेव. आम्ही लढवय्यांचं रक्त अंगात सळसळणारी माणसं आहोत. सहज आठवलं म्हणून सांगतो.. ‘बिगबाॅस सिझन चार’ हा एकाच टास्कमुळं शिखरावर पोचला होता. सगळ्या टास्कचा बाप – सी साॅ टास्क ! माझा विरोधी ग्रुप, हिंस्त्र जनावरांसारखा झुंडीनं माझ्यावर – माझ्या चारीत्र्यावर चिखलफेक, कचराफेक करत होता. पाण्याचा माराही होता. एक प्रकारचं भिषण ट्रोलींगच सुरू होतं. तब्बल तीन तास मी जागचा हललो नव्हतो. संपूर्ण सिझन त्या एका भन्नाट-जबराट टास्कनं गाजवला होता. सांगायचा मुद्दा हा की माझा कुठलाही हितशत्रू, काहीही करून माझं ‘सत्व’ हलवू शकत नाही.
View this post on Instagram
सोशल मिडीयावर कुत्सीतपणे, अर्वाच्य, अश्लील शब्दांत कमेन्ट करणार्या फेक अकाऊंटस्ना घाबरत नाही मी. यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला ‘रूतबा’ कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात, कारण आपल्या शब्दांना, विचारांना आणि त्या विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं त्यामुळं असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं…शत्रूवर नजर रोखायची…आणि गालातल्या गालात हसायचं..’पठाण’मधल्या शाहरूखसारखं. क्यों की हमारी ताकत का अंदाजा हमारे ज़ोर से नहीं, दुश्मन के शोर से पता चलता है !
नेमकं काय आहे प्रकरण ?
सागर बर्वे या आरोपीने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाचे पेज तयार केले होते. ‘तुझा दाभोळकर केला जाईल’ अशा स्वरूपाची धमकी त्याने ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.