जबलपूर – चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील या स्पर्धेत सलग दोन विजय साजरे केले आहेत.
जानकी पुरस्कार विजेते जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, निशा वैजल, वृषाली, प्रतीक्षा आणि पायल यांनी सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघाला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्र महिला संघाने यजमान मध्य प्रदेशला 1 डाव 12 गुणांनी पराभूत केले.
त्या पाठोपाठ नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने यजमान मध्य प्रदेश ला 1 डाव व 6 गुणांनी धूळ चारली. त्यामुळे यजमान मध्य प्रदेश संघांना घरच्या मैदानावर लागोपाठ पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आपली मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघांनी गटात दोन विजय संपादन केले आहेत.
CNG Price News : सीएनजीच्या दरात घट, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
महाराष्ट्राला विजयी हॅट्ट्रिक संधी
सलग दोन सामने जिंकून आगेकूच करत असलेल्या महाराष्ट्र संघांना जबलपूरच्या मैदानावर विजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्याची संधी आहे. राष्ट्रीय खेळाडू नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघ गटातील तिसरा सामना बुधवारी पश्चिम बंगाल विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात महाराष्ट्र संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच महाराष्ट्र महिला संघाचा गटातील तिसरा सामना पंजाब विरुद्ध होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राला मोठ्या फरकाने विजय संपादन करण्याची संधी आहे.