कर्जत | आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत कर्जत तालुक्यातील खांडवी या ग्रामपंचायतीने बाजी मारली. तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस खांडवी ग्रामपंचायतीस जाहीर झाले आहे. त्यामुळे खांडवी गावची समृद्ध गावच्या दिशेने वाटचाल होताना दिसून येत आहे.
आर.आर.पाटील सुंदर गाव सन 2022-23 अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदशनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत सन 2022-23 या वर्षात तालुकास्तरावर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषामध्ये नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने खांडवी या गावास तालुकास्तर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव म्हणुन गौरविण्यात आले आहे.
नगर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते खांडवीचे सरपंच प्रविण तापकीर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, पंचायत समितीचे अधिकारी राजा अटकोरे, सरपंच प्रविण तापकीर, ग्रामसेवक यू.बी.शेलार , संजय कांबळे, प्रकाश पठारे, दादासाहेब उल्हारे, शहाजी तापकीर, भाऊसाहेब पठारे, कुंडलिक सांगळे, प्रमोद तापकीर, अभिजित तापकीर, विशाल खोटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.