निमलष्करी दलाच्या जवानांना खादीचे गणवेश

खादी मंडळाची उलाढाल दुपटीने वाढण्याची शक्‍यता


केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निमलष्करी दलाच्या महासंचालकांना सूचना

पुणे – खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध उत्पादनांना लवकरच निमलष्करी दलाची विस्तारित बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. प्राप्त माहितीनुसार निमलष्करी दलाच्या जवानांना देशभरात लवकरच खादीचे गणवेश उपलब्ध होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने निमलष्करी दलाच्या महासंचालकांना तशा सूचना दिल्या आहेत. काही महिन्यांपासून यासंबंधात दोन्ही बाजूकडून पत्रव्यवहार होता. आता औपचारीक पातळीवर गृहमंत्रालयाने निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. असे झाले तर खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. कारण भारतातील निमलष्करी दलाला मोठ्या प्रमाणात गणवेशाची गरज असते.

पोलीस दलाच्या सर्व महासंचालकांना सूचना दिलेल्या सूचनानुसार केवळ खादीचे गणवेश नाहीतर या दलांच्या कॅन्टीनमध्ये खादी आणि ग्रामोद्योग महामंडळातर्फे उपलब्ध करण्यात आलेली ब्लॅकेट, लोणची, पापड, लोणी, साबण, शाम्पू,चहा, मोहरीचे तेल इत्यादीचा समावेश करण्यास सांगितले आहे.

सध्या मंडळाची वार्षीक उलाढाल 75 हजार कोटी रुपये आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर ती दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर पुरवठादारांना रोजगार निर्मिती करता येऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले.

गणवेशाचे नमुने तयार
गणवेशावर मंडळ बऱ्याच दिवसांपासून तयारी करीत आहे. त्यानुसार मंडळाने कॉटन आणि ऊलनचे गणवेश, सशस्त्र कारवाईवेळी वापरण्याचे गणवेश इत्यादीचे नमुने निमलष्करी दलांच्या व्यवस्थापनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांचे उत्पादन सुरू करता येऊ शकणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व्हि के सक्‍सेना यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.