नवी दिल्ली – निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. राजकीय पक्षांनी पोस्टर्स, पॅम्प्लेट वाटप, प्रचार रॅली आणि निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपातील निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असे आयोगाने म्हटले आहे. तसे आढळल्यास राजकीय पक्षांसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. राजकीय पक्षांना पाठवलेल्या नियमावलीत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्ष आणि उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे लहान मुलांचा वापर करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
आयोगाने त्याच्या नियमावलीत म्हटले आहे की, ही नियमावली कविता, गाणे, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्षाचे प्रदर्शन किंवा उमेदवाराचे चिन्ह यासह कोणत्याही स्वरूपात राजकीय प्रचारासाठी मुलांच्या वापरावर लागू होते.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यात सहभागी नसलेला नेता आणि एखादे मूल त्याच्या आई-वडिलांसह किंवा पालकांसह केवळ त्यांच्या जवळच असेल, तर अशा परिस्थितीत ते मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन मानले जाणार नाही.