डेहराडून: उत्तराखंड मधील केदारनाथ आणि बद्रिनाथ या देवस्थानाचे मुख्य पुजारी राज्याबाहेरच अडकले आहेत. करोनामुळे सध्या देशभर लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांना येथे या मंदिरांचे दरवाजे उघडण्याच्या विधीसाठी येणे अवघड बनले आहे. तथापि त्यासाठी उत्तराखंड प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. केदारनाथ मंदिराचे पुजारी महाराष्ट्रात तर बद्रिनाथचे पुजारी केरळात अडकले आहेत. या दोन्ही मंदिरांचे दरवाजे येत्या 29 आणि 30 एप्रिल रोजी उघडणार आहेत.
उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पलकुमार सिंग यांनी या संबंधात केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून या दोन्ही मुख्य पुजाऱ्यांना येथे आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. पण जरी गृहमंत्रालयाने त्यांना तशी अनुमती दिली तरी कोविड प्रतिबंधात्मक उपायांनुसार त्यांना चौदा दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना दरवाजे उघडण्याच्या मुख्य विधीला उपस्थित राहता येण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांनी आपले प्रतिनिधी नियुक्त करून ही औपचारिकता पूर्ण करावी, असा पर्याय काढण्यात आला आहे. या पूर्वी तीन ते चार वेळा हा पर्याय निवडण्यात आला होता.