कात्रज, दि. 12 (प्रतिनिधी) -पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरी प्रशासनाने अत्याधुनिक शीतगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या हस्ते डेअरीतील नवीन शीतगृह उभारणीचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संघाच्या अध्यक्ष केशर पवार, उपाध्यक्ष राहूल दिवेकर, संचालक गोपाळराव म्हस्के, कालिदास गोपालघरे, चंद्रकांत भिंगारे, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, कात्रज दूध परिवाराच्या श्री साई गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या थाटात सादरा केला जातो. यावर्षी देखील गणेश उत्सव थाटात साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डेअरीतील सेवकांबरोबरच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये एकत्र कुटुंबाचे महत्व तसेच थर्मोकॉल, प्लॅस्टिक व पॉलिथिन वापर टाळावा, गुलालाचा वापर टाळावा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या सारख्या पर्यावरण संवर्धना विषयी प्रबोधन केले.