ढेबेवाडी – कुसूर (ता. कराड) येथील एका युवकाचा पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे खून झाला आहे. सोमवार, (दि. 18) रोजी रात्रीच्या दहा वाजण्याच्या सुमारास ही घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वांग नदीपासून अलीकडे ढेबेवाडी- कराड रस्त्याला जोडून तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सपकाळ व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले. परंतु, वाटेतच उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपासास गती दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी व अन्य अधिकारी, कर्मचारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.