मुंबई – शेतकरी आंदोलकांची देशद्रोह्यांशी तुलना केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका शीख संघटनेने तक्रार दाखल केली होती.
त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगना राणावत हिला 22 डिसेंबर रोजी खार पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे समन्स जारी केले होते. पण कंगनाने हा समन्स धुडकावला असून ती आज तेथे उपस्थितच राहिली नाही. आपली अशील खार पोलिसांपुढे उपस्थित राहील अशी ग्वाही तिच्या वकिलाने मुंबई हायकोर्टातही दिली होती.
आज बुधवारी तिच्या वकिलांनी पोलिसांना दुसरी तारीख देण्याची विनंती केली. या आधीही आम्ही मुंबई पोलिसांना 22 डिसेंबरच्या आधीची तारीख द्या अशी विनंती केली होती पण संबंधित अधिकाऱ्याने ती मान्य केली नाही किंवा आमच्या विनंतीला त्यांनी प्रतिसादही दिला नाही, अशी तक्रार तिच्या वकिलांनी केली.
आता त्यांनी पुढील लवकरातील तारीख द्यावी, अशी विनंती पोलिसांना केली आहे. कंगनाला या प्रकरणात 25 जानेवारीपर्यंत अटक न करण्याची हमी पोलिसांनी हायकोर्टात दिली आहे.