लॉस एंजेलिस – फ्लोरिडामध्ये स्वैर गोळीबाराच्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओरलॅन्डो भागात ही घटना घडली. यावेळी झालेल्या गोळीबारादरम्यान माध्यमाचा एक छायाचित्रकारदेखील गंभीर जखमी झाला आहे. डायन लॉयन्स असे ठार झालेल्या पत्रकाराचे नाव असून छायाचित्रकार पत्रकाराचे नाव जेस वॉल्डेन असे आहे.
या भागात झालेल्या स्वैर गोळीबाराचे एका वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करण्यासाठी हे दोघेही घटनास्थळी दाखल झाले होते. या दोघांवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. त्यानंतर हा हल्लेखोर एका घरामध्ये घुसला आणि 9 वर्षाच्या एका मुलीवर आणि तिच्या आईवरही त्याने गोळ्या झाडल्या. यात ही मुलगी देखील मरण पावली आहे.
या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या हल्लेखोराने हा गोळीबार का केला असावा याची काही माहिती मिळू शकलेली नाही.
बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या भागात 20 वर्षे वयाच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही घटना समजल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्यासाठी टिव्हीवाहिन्यांचे प्रतिनिधी तेथे पोचल्यावर पळून गेलेला हल्लेखोर तेथे पुन्हा आला आणि त्याने पत्रकारांवर गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.