जेट एअरवेज कंपनीचा शेअर कोसळला

मुंबई – जेट एअरवेजने आपली सेवा तात्पुरती बंद करण्याचे घोषित केल्यानंतर कंपनीच्या शेअरचा भाव सोमवारी तब्बल 32 टक्‍क्‍यांनी घसरला व प्रति शेअर 163 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला. शेअरबाजारात नोंदणी झाल्यापासून जेटच्या शेअरची झालेली ही सर्वात मोठी
पडझड आहे.

एका वर्षात जेटच्या शेअरचा भाव प्रति शेअर 641 रुपयांवरून 163 इतका म्हणजे तब्बल 75 टक्‍क्‍यांनी घसरल्याचे बघायला मिळत आहे. जेट एअरवेजच्या शेअरची नोंदणी शेअर बाजारात 14 मार्च 2005मध्ये झाली ज्यावेळी प्रति शेअर 1,100 रुपये किंमत होती. आज गुरुवारी जेटच्या शेअरची किमत घसरली त्याचवेळी प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाइसजेटच्या शेअरची किंमत एका दिवसात 8.5 टक्‍क्‍यांनी वधारली आहे. हवाई उद्योग क्षेत्रासाठी ही दुर्दैवी घटना आहे. या क्षेत्रातल्या खासगी कंपन्यांचा विचार केला तर जेट एअरवेज ही भारतातली या क्षेत्राचा पाया रचणारी कंपनी होती असे जाणकारांनी सांगितले.

तरीही कर्जदात्या बॅंका आशावादी

जेट एअरवेज विमान कंपनी चालू राहावी याकरिता तातडीने 400 कोटी रुपये द्यावे असे कर्जदात्या 26 बॅंकांना कंपनीने सांगितले होते. मात्र यामुळे हा प्रश्न सुटणार नाही असे कारण दाखवून या बॅंकांनी ही मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे जेट एअरवेजची सेवा थांबविण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात कंपनीचे भागभांडवल विक्री करण्यासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला यश मिळेल आणि भांडवल खरेदी होईल याबाबत आम्हाला अशा आहे असे बॅंकर्सना वाटते. ही प्रक्रिया पुढील एक-दोन महिने चालू राहणार असल्याचे संकेत बॅंकांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.