फडणवीस यांनी घेतलाय वंचित आघाडीचा धसका

चंद्रकांत खंडाईत यांची टीका

सातारा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंचित बहुजन आघाडी भाजपाला मदत करत आहेत असे विधान वारंवार करून बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षातील स्वकियांना थोपवण्याचे मुख्यमंत्र्याचे प्रयत्न अपयशी ठरले असून त्यांनीच वंचित आघाडीचा धसका घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते पुढे म्हणाले देशाचे संविधान धोक्‍यात आले असून काहीजण उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. मोदी सरकार अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालत आहेत. शोषितांच्या जगण्याचे मूलभूत प्रश्‍न आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सहदेव ऐवळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंचित आघाडीचे दाखले देऊन जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. मुख्यमंत्र्यांची ही विधाने वैफल्यग्रस्ततेतून सुरु आहेत. कॉंग्रेस व आघाडीच भाजपला अप्रत्यक्ष मदत करत असताना फडणवीस मात्र वंचित आघाडीचेच नाव घेत आहेत. यावरूनच त्यांनी आमचा धसका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचित आघाडीच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रचार दौरा अंतिम टप्प्यात असून आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर व कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली आहे. आंबेडकर यांची सांगता सभा दि. 21 एप्रिल रोजी जनता सभागृह मंडई नगर परिषद शेजारी कराड येथे होणार आहे. मिशी व कॉलर ही प्रतिके मिरवणाऱ्यांनी साताऱ्याचा काय विकास केला. सातारा जिल्हयात ग्रामीण आरोग्य सेवेची वाट लागली असून साडेतीनशे नराठी शाळा बंद झाल्या. खासदारांनी यांच्यावर कधीच वाच्यता केली नाही. जे पुरंधरे चुकीच्या पध्दतीने इतिहासाचा विभ्रम करतात त्यांना खासदार मूकपणे मान्यता देतात आणि मुख्यमंत्री त्या पुरंधरेंचा सत्कार करतात त्यावर कोणीच काही बोलत नाही असा घणाघात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पार्थ पोळके यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.