पुण्यात राजकीय वातावरण तापणार

प्रचार शेवटच्या टप्प्यात : आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार


प्रचार 21 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संपणार

पुणे – गेल्या काही दिवसांपासून शहरातील उन्हाचे चटके वाढले असले तरी, लोकसभा निवडणुकीचे वातावरण अद्याप तापलेले नव्हते. मात्र, आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्याने पुढील चार दिवस पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचा प्रचार 21 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता संपणार असल्याने, राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांच्या सभा पुण्यात होणार असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

येत्या 23 एप्रिल रोजी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. पुण्यातील लढत कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सरळ सरळ होणार असली तरी, बहुजन वंचित आघाडी, समाजवादी पक्षाचाही उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात चार टप्प्यांत निवडणुका असल्याने पहिल्या दोन टप्प्यांत सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक गुंतून होते, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाल्याने आता तिसऱ्या टप्प्यासाठी हे स्टार प्रचारक पुण्यात चांगलेच राजकीय वातावरण तापविणार आहेत. भाजपकडून 20 एप्रिल रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या 2 सभा होणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही एक सभा होणार आहे. तर कॉंग्रेसकडून अद्याप सभांसाठी स्टार प्रचारकांना निमंत्रणच पाठविण्यात आली असून या शेवटच्या दोन दिवसांत खासदार ज्योतिरादित्य शिंदे, अभिनेता रजा मुराद, खासदार कुमार केतकर, तसेच प्रियंका गांधी यांचा रोड शो करण्याचे नियोजन आहे. तर कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांच्या रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे.

तर कॉंग्रेसच्या प्रचाराचा समारोप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेने होणार असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांच्याही सभा होणार असल्याचे सांगण्यात आले. तर भाजपकडून अद्याप प्रचाराच्या शेवटच्या दिवसाचे नियोजन निश्‍चित केलेले नाही. या शिवाय, वंचित बहुजन आघाडीची सभाही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होणार असून आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांची सभा होणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस प्रचाराचा धुरळा उडणार असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.