थेऊर, (वार्ताहर) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल झालेपासून फरार असलेल्या थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कवडे यांच्या निलंबनाचा आदेश पारित केला आहे. जयश्री कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने पुणे महसूल विभागातील त्यांची कारकीर्द वादळी ठरली आहे.
मौजे भोसरी येथे एकाच गावात, एकाच गट नंबरमधील फेरफारबाबत जयश्री कवडेंनी तीन वेळा आदेश पारित केले होते. त्यामुळे 17 ऑक्टोबर 2022ला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांना निलंबित केले होते.
त्यानंतर थेऊर मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना 13 मार्चला त्यांच्यासह त्यांच्या दोन खासगी इसमांवर सात हजार रुपयांची लाच स्वीकारलेचा गुन्हा एसीबीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनला दाखल केला आहे; मात्र कवडे या त्या दिवसापासून फरार असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांचे 19 मार्चला निलंबन केले आहे.
कवडे या गुन्हा दाखल झालेपासून मिळून आलेल्या नसलेने आणि तसेच त्यांनी इकडील कार्यालयास कोणताही संपर्क केला नसलेने त्यांना शासन सेवेतून गुन्हा दाखल झालेच्या मानिव दिनांकापासुन म्हणजे 13 मार्चपासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे आणि ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील. असे स्पष्टपणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पारित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
जुन्नर तहसीलला जावे लागणार
जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटल्याप्रमाणे जयश्री कवडे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय जुन्नर हे राहिल, तसेच त्यांना तहसिलदार जुन्नर यांचे पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत श्रीमती जयश्री कवडे, मंडल अधिकारी थेऊर यांनी खाजगी नोकरी स्विकारु नये किंवा धंदा करु नये, त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांचेविरुध्द कारवाई करणेत येईल, तसेच ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविणेस पात्र ठरतील.