Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा बांधवाना आंतरवाली सराटी गावात येण्याचे आवाहन केले होते. या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे यांनी सात कोटींचा आरोप करणाऱ्या अजित पवार गटातील छगन भुजबळांना मराठ्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.
मनोज जरांगे म्हणाले,’महाराष्ट्रतला मराठा समाज निधी देणार होता, जाहीर सांगतो. पण आम्ही सांगितलं, आम्हाला सेवा करायची आहे, एक रुपयाही नको. आम्ही 123 गावातून निधी गोळा केला, आणि त्यातून 21 लाख जमा झाले. लगेच हिशोब घे म्हणावं त्याला सात कोटी वाल्याला. हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी नाही, ते सात-आठ वेळा जाऊन आलंय, आणखी जायची वेळ आली त्याची परत…’ असं म्हणत जरांगे यांनी सात कोटींचा आरोप करणाऱ्या भुजबळांना मराठ्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.
तत्पूर्वी, उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे यांनी राज्यव्यापी दौरा केला होता. यातच त्यांनी 14 ऑक्टोबरच्या सभेला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. आजच्या सभेत जरांगे पाटील सरकारला देण्यात आलेल्या 40 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला.