नवी दिल्ली – जनधन खात्यातील रक्कम वेगाने वाढत असून आता जनधन खात्यातील ठेवीची रक्कम 1.5 लाख कोटी रुपयांवर गेली असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या 44 कोटीवर गेली आहे. तर या खात्यातील रक्कम 1.5 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
15 ऑगस्ट 2014 रोजी जनधन योजनेची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. साडेसात वर्षांमध्ये या खात्यांची संख्या आणि या खात्यातील रक्कम वाढत असल्याचे दिसून येते. 34 कोटी खाती सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकात आहेत. आठ कोटी खाती विभागीय ग्रामीण बॅंकांमध्ये तर सव्वा कोटी खाती खासगी बॅंकांत आहेत.
31 कोटी जनधन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड देण्यात आले आहे.29 कोटी जनधन खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत. विशेष बाब म्हणजे महिला खातेदारांची संख्या 24 कोटी आहे. या खात्याना बेसिक सेविंग बॅंक डिपॉझिट खाते समजले जाते. त्यामुळे या खात्यामध्ये किमान रकमेची अट लागू नाही. 3 कोटी 65 लाख खात्यात शून्य रक्कम आहे.
एकूण खात्यात या शून्य रकमेच्या खात्याचे प्रमाण केवळ 8.3 टक्के आहे. सरकारी योजनांतील रक्कम या खात्यात थेट जमा करता येते. शिष्यवृत्ती, अनुदान, निवृत्ती वेतन, करोनासाठीची मदत या खात्यात थेट जमा केली जाते.