श्रीनगर – सुरक्षा दलांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे की, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये, कुपवाडा येथील मच्छल सेक्टरमध्ये एलओसीजवळ सुरक्षा जवानांनी आज सकाळी पाकिस्तानी हद्दीतून होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन घुसखोर दहशतवादी टिपले गेले.
घटनास्थळी चार एके रायफली आणि सहा हातबॉम्ब असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नियंत्रण रेषजवळील ही कारवाई दुपारी उशिरापर्यंत सुरूच होती. घुसखोरीचा प्रयत्न नेमका किती जणांनी केला होता याची माहिती मिळू शकलेली नाही.