शिक्रापूर -पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर (ता. शिरूर) येथे होत असलेली वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजन केल्या जात आहेत. त्यातच सध्या शिक्रापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जॅमर लावत कारवाई करण्यास शिक्रापूर पोलिसांनी प्रारंभ केला असून दररोज 30 ते 35 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने कोंडी लवकरच फुटण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शिक्रापूर येथील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाचे प्रमुख उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र मदने, ट्रॅफिक वार्डन किरण थोरात, अमोल राऊत, नारायण थोरात यांसह आदी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत रस्त्यामध्ये बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येणारी वाहने, विरुद्ध दिशेला लावलेली वाहने यांना जॅमर लावून वाहनांवर कारवाई करत असून दररोज सुमारे 30 ते 35 ाहनांवर पोलीस कारवाई करत आहे. त्यामुळे शिक्रापूर येथे रस्त्याच्याकडेला लावली जाणाऱ्या वाहनचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. अशा पद्धतीची कारवाई दररोज सुरूच ठेवणार असल्याचे राजेश माळी यांनी सांगितले.
…चर्चा सर्वत्र
शिक्रापूर येथील चाकण चौकात दररोज होणारी वाहतूककोंडी विधानसभेसह सर्वत्र गाजत आहे. पुणे ग्रामीण वाहतूक विभागाच्या पोलीस पथकाला देखील शिक्रापूर येथे येवून वाहतूककोंडीवर उपाययोजना करावी लागली आहे. तसेच शिक्रापूर पोलीस देखील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरलेले असतात अनेकदा पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे.