नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सुलिवन मंगळवारी भारतात आले आहेत.
आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अन्य काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या दौऱ्यासंदर्भात चर्चा केली.
सुलिवन यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान जागतिक पातळीवरच्या घडामोडींबाबतही चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले. भारत आणि अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर, ऍडव्हान्स टेलिकॉम, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि संरक्षणासारख्या 7 क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाबाबत सहकार्य केले जाणार आहे. त्याचा आराखडा काल सुलिवन आणि डोवाल यांच्यातल्या चर्चेदरम्यान तयार केला गेला.
दोन्ही देशांमध्ये पूर्ण क्षमतेने सहकार्य करण्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. संरक्षण व्यापार, उच्च तंत्रज्ञानावर आधारीत व्यापार, गुंतवणूक करण्यातील सर्व संभाव्य अडथळे दूर करण्यात आले असल्याचे सुलिवन यांनी जयशंकर यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर सांगितले.
अमेरिकेतील संशोधक आणि भारतातील संशोधकांमधील सहकार्य वाढवण्यावर आणि दोन्ही देशातील विद्यार्थ्यांना परस्परांच्या देशांमध्ये शिक्षणासाठी प्रवेशावरही मोदींच्या भेटीत शिक्कामोर्तब अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.