नवी दिल्ली -देशाला पदके मिळवून दिलेल्या कुस्तीपटूंचे एक महिन्यापेक्षा जास्त दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत अद्याप एकही मत व्यक्त केलेले नाही. त्यांचे मौन खूपच वेदनादायी आहे, अशा शब्दांत भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताचे गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची आम्ही भेट घेतली. त्यांच्या विनंतीला मान देत आंदोलन स्थगितही केले. मात्र, हे सगळे घडत असताना पंतप्रधानांनी यावर एकही शब्द बोलू नये, याची खूप खंत वाटते. त्यांनी आमची दखल घेणे गरजेचे होते. त्यांचा एक शब्द आमच्यासाठी पाठिंब्याचा आधार बनला असता, असेही विनेश म्हणाली.
यापूर्वी जेव्हा आम्ही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करताना परदेशात एखाद्या स्पर्धेला रवाना व्हायचो किंवा तेथून पदके जिंकून परत यायचो तेव्हा सर्वात आधी पंतप्रधान मोदी हेच आमचे अभिनंदन करत होते. आज त्यांना आमच्याशी बोलण्यासाठीही वेळ व इच्छा नाही, याचे वाईट वाटते. आम्ही कोणा त्रयस्थासाठी आंदोलन केलेले नाही. आमच्यावर झालेला अन्याय दूर केला जावा, ही आमची किमान अपेक्षा आहे, असेही विनेशने सांगितले.
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करा, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला कुस्तीपटूंना न्याय द्या, हीच आमची अपेक्षा आहे. या सात महिला कुस्तीपटूंपैकी एक अल्पवयीन खेळाडू आहे, जिच्यावर सध्या तिच्याच घरातून दडपण आणले जात आहे व तक्रार मागे घेण्यासाठी दबावही टाकला जात आहे. मात्र, आम्ही सगळे तिच्याबरोबर आहोत. आता सरकार काय करते, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असे विनेशने सांगितले.
अटकेसाठी निर्माण झाला पेच
ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांसमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. महिला कुस्तीपटूंनी ज्या ज्या देशांतील स्पर्धेदरम्यान हे घडले त्याचा उल्लेख केला आहे, त्या सर्व देशांशी दिल्ली पोलिसांना संपर्क साधावा लागत आहे.
कझाकिस्तान, मंगोलिया, बल्गेरिया,इंडोनेशिया व किर्गीस्तान येथे महिला कुस्तीपटूंबाबत गैरकृत्य घडल्याचे कुस्तीपटूंच्या जबाबात असल्याने तेथून पुरावे गोळा करण्याचे काम आता दिल्ली पोलीस करत आहेत. त्यामुळेच येत्या 15 जूनपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही.