कोलकाता : हवाईदलासाठी दोनशे लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे अशी माहिती संरक्षण सचिव अजयकुमार यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि कंपनीला सरकारने 83 तेजस विमाने पुरवण्याची ऑर्डर दिली आहे.
ती आता अंतिम टप्प्यात आहे. त्याखेरीजही अन्य 110 विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली जात आहे असे ते म्हणाले. हवाईदल सक्षम करण्यासाठी आम्ही ही खरेदी शक्य तितक्या लवकर होईल यासाठी प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले. त्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि कंपनीची विमान उत्त्पादनाची क्षमता वाढवली जात आहे.
सध्या या कंपनीत वर्षाला आठ विमाने तयार केली जातात ती क्षमता वर्षाला 16 विमानांच्या उत्पादनाएवढी वाढवली जाईल असे ते म्हणाले. भारतीय हवाईदलाकडे विविध जातीची अनेक लढाऊ विमाने कार्यरत आहेत पण जुनी विमाने या सेवेतून काढून टाकली जात असल्याने नवीन विमानांची मोठी गरज निर्माण झाली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.