राष्ट्र उत्थानाचा पाया हा महिला कल्याण- स्मृती इराणी

पणजी : राष्ट्राच्या उत्थानाचा पाया हा महिला कल्याण आहे; विश्वभरात तसेच देशात महिलांद्वारे होत असलेल्या राष्ट्र विकासाची चर्चा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालकल्याण तसेच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी गोवा येथे केले आहे.

महिला व बालकल्याण संचलनालय तसेच आरोग्य सेवा संचलनालय, गोवा सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत वर्षभरात 70 लाख महिलांनी स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करून घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यासोबतच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी देखील 30 लाख महिलांनी करून घेतली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गोवा सरकार पुरस्कृत गोवा राज्यातील महिला उद्योजिकांसाठी यशस्विनी योजनेचा प्रारंभ यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आला.

या अंतर्गत महिला बचत गटांना पाच लाखांचे अर्थ सहाय्य दिले जाणार आहे. सोबतच स्वास्थ्य सखी व स्तनांच्या कर्करोगाची तपासणी आणि उपचार या योजनांचा देखील प्रारंभ याप्रसंगी करण्यात आला.

केंद्रीय योजना प्रथमच निश्‍चित कालावधीसाठी…
भारत सरकारने कुटुंबाच्या उन्नतीसाठी आणलेल्या योजनांमध्ये इतिहासात पहिल्यांदाच निश्‍चित कालावधीच्या आधीच लक्ष्य प्राप्ती केली. उज्वला योजनेच्या माध्यमातून 3 वर्षात 8 कोटी महिलांना गॅस सिलेंडर मिळाला, जून 2019 पर्यंत राष्ट्रीय आजिविका मिशनच्या माध्यमातून 3 कोटी ग्रामीण भगिनींना 2 लाख कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले गेले आहे. अशाच प्रकारचे यश यशस्विनी योजना प्राप्त करो, अशा शुभेच्छा इराणी यांनी याप्रसंगी दिल्या.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.