नारायण राणेंची समिती नेमून आरक्षण देणं चूक होती : हसन मुश्रीफ

कोल्हापूर  – खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन झाले. या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी, मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नसल्याचे सांगत आयोग न नेमता नारायण राणेंची समिती नेमून आरक्षण देणं चूक होती, असे म्हटले. गरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यात विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळावर मूक आंदोलन झाले.

या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पावसामुळे मुंबईत अडकले होते. काही तासांनी त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवत आपली भूमिका मांडली.

’50 टक्क्‌यांच्या आरक्षणाची मर्यादा असल्याचे कारण पुढे करत मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ होत आहे. पंरतु गरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचं आहे. मराठ्यांना शिक्षण नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. मराठे राजकीय आरक्षण मागत नसून स्वतःच्या उन्नतीसाठी शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मागत आहेत.’

‘संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची लढाई यशस्वी होईल. राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला आर्थिक मदत केली. देशभरात केवळ सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकरांना मदत केली होती. इतिहासातील अशा घटनांमुळे कोल्हापूर ही समतेची भूमी आहे हे सिद्ध होते. याच भूमीवरून आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले आहे. हे आरक्षणानंतरच संपेल.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.