पुणे – समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना हे आम्ही केलं हा अहंकार नसावा. “स्वार्थ’ हा सेवेची प्रेरणा कधीही होऊ शकत नाही. सेवा धर्म गहन आहे, परंतु तो माणुसकीचा धर्म आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून उभारलेल्या “सेवा भवन’ प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, जनकल्याण समिती’चे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, जनकल्याण सेवा फाऊंडेशन’चे संचालक महेश लेले आणि ‘डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधी संस्थे’चे कोषाध्यक्ष माधव (अभय) माटे उपस्थित होते.
जनकल्याण समितीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या “अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच हरीओम काका मालशे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. रवींद्र साताळकर यांनी केले. तुकाराम नाईक, विनायक डंबीर यांनी माहिती दिली तर आभार अभय माटे यांनी मानले.