मुंबई – ऑस्ट्रेलियाचा जादुई फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वॉर्न अवघ्या 52 वर्षांचा होता. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, त्यांचा प्रतिस्पर्धी आणि खास मित्र, असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्यांची आठवण काढताना एक भावनिक संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शेन वॉर्नचे स्मरण करताना सचिनने लिहिले की, “आम्ही मैदानावर काही संस्मरणीय सामने खेळले आहेत आणि त्यानंतर तितकेच संस्मरणीय क्षण सोबत घालवले आहेत. मला तुझी आठवण फक्त एक महान क्रिकेटर म्हणून नाही, तर एक चांगला मित्र म्हणूनही आहे. वॉर्नी मला खात्री आहे, तू तुझ्या विनोदबुद्धीने व करिष्माने स्वर्गातही सर्वांची मने जिंकत असशील!’ दोन्ही दिग्गज क्रिकेटपटू निवृत्तीनंतरही अनेकदा एकमेकांना भेटत असत.
We have had some memorable battles on the field & shared equally memorable moments off it. I miss you not only as a great cricketer but also as a great friend. I am sure you are making heaven a more charming place than it ever was with your sense of humour and charisma, Warnie! pic.twitter.com/j0TQnVS97r
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 4, 2023
वॉर्नचा जलवा आयपीएलमध्येही पाहायला मिळाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने पहिले विजेतेपद पटकावले होते. पुण्यतिथीनिमित्त राजस्थान रॉयल्सनेही ट्विट करून त्याची आठवण काढली आहे. याशिवाय ऍडम गिलख्रिस्ट, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, शेन वॉटसन यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी आपल्या वॉर्नसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
थायलंडमध्ये झाले होते निधन
2022 मध्ये थायलंडमधील “कोह सामुई’ बेटावर फिरण्यासाठी गेलेला वॉर्न आपल्या हॉटेलच्या खोलीतच हृदयविकाराचा झटका आल्याने अचानक कोसळला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांनी प्रयत्न करूनही त्याचे प्राण वाचू शकले नव्हते. दिग्गज क्रिकेटपटूच्या अचानक जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला होता. क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज फिरकीपटूंमध्ये शेन वॉर्नची गणना केली जाते. मुथय्या मुरलीधरननंतर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर आहे. त्याने 145 कसोटी सामन्यात 708 बळी घेतले आहेत.