जेरुसलेम – इस्रायलच्या पायदळाने गाझामध्ये घुसून हमासविरोधात जोरदार कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबरीने गाझामध्ये अपहरण करण्यात आलेल्या इस्रायलमधील 200 नागरिकांचा शोध देखील घेतला जाऊ लागला आहे. या शोधमोहिमेमध्ये इस्रायलच्या सैन्य दलाच्या बरोबर इस्रायलमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकेच्या सुरक्षा दलांच्या सैनिकांनीही भाग घेतला आहे. ओलिसांना शोधण्यासाठी या अमेरिकेच्या सैनिकांचा पुढाकार विशेष आहे, असे अमेरिकेचे संरक्षण उपमंत्री ख्रिस्तोफर मिलर यांच्या हवाल्याने पेंटॅगॉनने म्हटले आहे.
इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने प्रारंभीपासूनच लष्करी सहाय्य पाठवून दिले आहे. युद्धनौका आणि लढाऊ विमानेही इस्रायलमध्ये दाखल झाली आहेत. याशिवाय प्रत्यक्ष पायदळाच्या कारवाईसाठी कमांडो इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. अगदी अलिकडच्या काळात अमेरिकेची एक विशेष तुकडीही इस्रायलमध्ये पाठवून दिली गेल्याचे मिलर यांनी सांगितले. मात्र या तुकडीतील सदस्यांची संख्या आणि त्यांच्या तैनातीचे नेमके ठिकाण त्यांनी सांगितले नाही.
हे विशेष पथक प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होणार नाही. मात्र हमासने अपहरण केलेल्या आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांचा शोध घेत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांशी केलेल्या चर्चेतून या विशेष पथकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
अन्य देशांची पथकेही इस्रायलमध्ये दाखल
अमेरिकेपाठोपाठ काही पाश्चात्य देशांमधील सुरक्षा दलांची पथकेही इस्रायलमध्ये गुपचूप दाखल झाली आहेत. या पथकांवरही ओलीस असलेल्या नागरिकांची सुटका करणे, इस्रायली नागरिकांना सुखरुप बाहेर काढणे आणि मोठ्या लष्करी संघर्षाच्यावेळी सर्वसामान्यांची जीवितहानी होऊ न देणे. यासाठी इस्रायल आणि शेजारील लेबेनानमधील अन्य देशांच्या नागरिकांना युद्धभूमीमधून बाहेर काढण्याची जबाबदारी आहे, असेही मिलर यांनी सांगितले.
हमासच्या आणखीन एका कमांडरचा खात्मा
दरम्यान इस्रायलच्या गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इस्रायलच्या फौजांनी हमासच्या आणखीन एका कमांडरचा खात्मा केला. इब्राहिम बिआरी असे या कमांडरचे नाव असून तो हमासच्या सेंट्रल जबालिया बटालियानचा कमांडर होता. इस्रायलमध्ये नरसंहार घडवण्यासाठी 7 ऑक्टोबरला “नुखभा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाठवण्याची जबाबदारी याच्यावरच होती, अशी माहिती मिळते आहे.