गाझापट्टी – हमास आणि इस्रायलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे १९ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. असे असूनही कोणीही मागे हटू इच्छित नाही. इस्रायलने हमासला पूर्णपणे संपवण्याचा संकल्प केला आहे. त्याचवेळी आता दहशतवादी संघटनेनेही इशारा दिला आहे. गाझामध्ये हमासला द्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा मनसुबा कधीही सफल होणार नाही, असे हमासचे म्हणणे आहे. नेतान्याहू सरकारलाही हे माहीत आहे, पण त्यांना या सत्याला सामोरे जावेसे वाटत नाही, असे हमासने म्हटले आहे.
आता अल-कासम ब्रिगेड्सचे प्रवक्ते अबू ओबैदा यांचा एक ऑडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी हमासला नष्ट करण्याचा इस्रायलचा हेतू कधीही सफल होणार नाही, याची पुष्टी केली आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे ओलीसांची सुटका करण्यात मदत होणार नाही, असे ते म्हणाले.
ओबैदा असेही म्हणाले की, ओलिसांची सुटका गाझावरील हल्ल्याच्या आक्रमकतेवर अवलंबून आहे.इस्रायल अशा प्रकारे ओलिसांची सुटका करू शकणार नाही. त्याचे सततचे हल्ले किंवा त्याच्या लष्करी मोहिमा यात मदत करणार नाहीत. शत्रूच्या लोकांना जिवंत सोडणे शक्य नाही. संवाद हाच त्याचा एकमेव पर्याय आहे. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय चालणार नाही.
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये २५० हून अधिक लोकांना दहशतवादी गटाने ओलीस ठेवले होते. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टी उद्ध्वस्त केली. सध्या हे युद्ध संपताना दिसत नाही. १२९ लोक हमासच्या तावडीत असल्याचे इस्रायली प्रशासनाचे म्हणणे आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आणखी ओलीसांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा हमासने दिला आहे. त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावरही निशाणा साधला आहे.