मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याच्या वाढदिवशी विजयाची भेट देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला पुन्हा एकदा अपयशाचाच सामना करावा लागला. यंदाच्या आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीने थाटात झाली होती. मात्र, सलामीवीर इशान किशन बाद झाला व त्यांची गाडी रुळावरून घसरली. किशनने अवघ्या 8 धावा केल्या. रोहितही चांगला खेळत असताना कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर अनावश्यक फटका मारून 31 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावून 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर मुंबईचे नावाजलेले फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. डेवाल्ड ब्रेवीस, सूर्यकुमार यादव यांनी साफ निराशा केली. तिलक वर्मा व कॅरन पोलार्ड यांनी सावध खेळ करत संघाचा डाव सावरण्याचे प्रयत्न केले. हे दोघे खेळपट्टीवर असेपर्यंत मुंबईच्या विजयाच्या आशा कायम होत्या. वर्माने तडाखेबंद फलंदाजी केली. मात्र, तोदेखील 38 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 2 षटकार फटकावले. पोलार्डने 19 धावांची खेळी केली. त्यालादेखील पंड्यानेच बाद केले. पाठोपाठ पंड्याने डॅनियल सॅमलाही तंबूचा रस्ता दाखवला. जयदेव उनाडकटही धावबाद झाला व मुंबईच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.
लखनौकडून कृणाल पंड्याने 3 गडी बाद केले. आयुष बदोनी, मोहसीन खान, रवी बिष्णोई व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या लढतीत मुंबई इंडियन्स विजय मिळवत अपयशाची मालिका खंडित करेल व सचिन तेंडुलकरला त्याच्या वाढदिवशी विजयाची भेट देईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती, त्यामुळे या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम खच्चून भरले होते. मुंबईची फलंदाजी सुरू झाली व रोहितने किशनसह डावाची सुरुवात केली. तरीही मैदानात जयघोष सचिन… सचिन… हाच सुरू होता. मात्र, मुंबईच्या यंदाच्या स्पर्धेतील सलग आठव्या पराभवामुळे चाहत्यांनी निराशाच झाली.
Thank you for your #SuperGiant roars. What an amazing performance! ⁰#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/mZ6mOZlYsp
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल स्पर्धेत रविवारी लखनौ सुपर जायंट्स संघाने विजयासाठी 169 धावा करण्याचे आव्हान
ठेवले होते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत लखनौला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने लखनौचा सलामीवीर क्वांटन डीकॉकला (10) लवकर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर कर्णधार व सलामीवीर लोकेश राहुलने मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्याने मनीष पांडेसह अर्धशतकी भागीदारी केली. पांडे स्थिरावलेला असतानाही अनावश्यक फटका मारून 22 धावांवर बाद झाला. मार्कस स्टोनिस व कृणाल पंड्या यांनी साफ निराशा केली. दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने दीपक हुडा (10) व आयुष बदोनी (14) यांच्यासह संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघेही बेजबाबदार पद्धतीने फटका मारून बाद झाले.
राहुलने संघाची धुरा एकाकीपणे वाहताना दमदार शतक साकार केले. त्याने आपल्या नाबाद 103 धावांच्या खेळीत 62 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 4 षटकारांची बरसात केली. या स्पर्धेत राहुलनेच लखनौचे नेतृत्व करताना सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्याच्या शतकी खेळीमुळेच लखनौ संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावांची मजल मारता आली. मुंबईकडून कॅरन पोलार्ड व रेले मॅर्डीथ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह व डॅनियल सॅम यांनी प्रत्येकी 1 गडी
बाद केला.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स – 20 षटकांत 6 बाद 168 धावा. (मनीष पांडे 22, आयुष बदोनी 14, क्वांटन डीकॉक 10, दीपक हुडा 10, लोकेश राहुल नाबाद 103, कॅरन पोलार्ड 1-8, रेले मॅर्डीथ 2-40, जसप्रीत बुमराह 1-31, डॅनियल सॅम 1-40).
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 8 बाद 132 धावा. (रोहित शर्मा 39, तिलक वर्मा 38, कॅरन पोलार्ड 19, कृणाल पंड्या 3-19).