नवी दिल्ली – दिल्ली कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद वाढत चालले आहेत. येथील सातपैकी केवळ तीन जागा कॉंग्रेस पक्ष लढणार आहे. मात्र पक्षांतर्गत मतभेदामुळे प्रचार चांगलाच ढेपाळला आहे. त्याचा मतदानाच्या वेळी पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.
दिल्ली उत्तर पूर्व मतदारसंघातून कॉंग्रेसकडून कन्हैय्या कुमार ( Kanhaiya Kumar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे मनोज तिवारी यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. अलिकडेच कन्हैय्या कुमार यांच्या उमेदवारीवरून दिल्ली कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत जोरदार वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाद इतका विकोपाला गेला की परस्परांबद्दल अपशब्दही वापरले गेले. अशी चर्चा आहे की कन्हैय्या कुमार यांच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही नाराज आहेत. केवळ इतकेच नाही तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीसोबत आघाडी केल्यामुळेही पक्षामध्ये नाराजी आहे.
हीच नाराजी आणि संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद्र सिंह लवली यांनी बैठक बोलावली होती. दिल्ली कॉंग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया हे सुध्दा बैठकीला हजर होते. मात्र बैठकीला सुरूवात होताच नेत्यांमध्ये वाद सुरू झाला.
माजी खासदार संदीप दीक्षित यांनीही बैठकीला हजेरी लावली. मात्र त्यांनी मंचावर न जाता थेट आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जाउन बसणे पसंत केले. जेंव्हा अरविंद्र सिंह लवली यांनी त्याला स्टेजवर बोलावले तेंव्हा त्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. कन्हैय्या कुमार यांनीही त्यांना स्टेजवर बोलावले तेंव्हा दीक्षित चिडले आणि त्यांनी कन्हैय्या कुमार यांच्याच उमेदवारीला विरोध दर्शवला.
कन्हैय्या कुमार यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या उत्तर पूर्व दिल्लीच्या जागेसह दिल्लीतील अन्य जागांवरही पक्षाला नुकसान भोगावे लागणार आहे. कन्हैय्या कुमार यांनीही दीक्षित यांना उत्तर दिले. तुम्ही भारतीय जनता पार्टीची भाषा बोलत असल्याची त्यांनी सुनावले. अन्य नेत्यांनीही दीक्षित यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणाचे ऐकले नाही.
यावेळी दीक्षित यांनी काही अपशब्दांचाही वापर केला. दीपक बाबरिया यांनाही यावेळी बरेच सुनावण्यात आले. झाल्या प्रकारामुळे कन्हैय्या कुमार यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले.