पुणे :- मराठवाडा मित्रमंडळ क़ॉलेज ऑफ कॉमर्सच्या (एमएमसीसी) साध्वी धुरी हिने मएसो सीनियर कॉलेजच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत एकूण सात प्रकारांत अव्वल क्रमांक पटकावला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे शहर विभागीय क्रीडा समिती यांच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा डेक्कन जिमखाना येथील टिळक टॅंक येथे ही स्पर्धा झाली. क्रीडा भारती पुणे महानगरचे अध्यक्ष शैलेश आपटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, पुणे शहर विभागीय क्रीडा समितीचे सचिव शिरीष मोरे, स्पर्धा सचिव अभिजीत गर्ग उपस्थित होते.
या स्पर्धेत साध्वीने 400 मीटर वैयक्तिक मिडले, 200 मीटर वैयक्तिक मिडले, 100 मीटर बटरफ्लाय, 50 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर फ्री स्टाइल, 100 मीटर फ्री स्टाइल आणि 50 मीटर फ्री स्टाइलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.