नवी दिल्ली – सध्या बुकलेट स्वरुपातील जुने वाहन परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )असलेल्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परिवहन विभागाकडून शेवटची संधी दिली जात आहे. परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्हय़ांच्या ‘डीटीओं’ना हस्तलिखित वाहन परवाना लवकरात लवकर ऑनलाईन करण्यास सांगितले आहे. यासंबंधी ऑनलाईन नोंदणीची सुविधा भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर 12 मार्चपर्यंतच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे 12 मार्चनंतर हस्तलिखित जारी केलेल्या परवान्यांसह ड्रायव्हिंग लायसन्सची बॅकलॉक एन्ट्री करता येणार नसल्याचे परिवहन मंत्रालयाने कळवले आहे.
भारत सरकारच्या निर्देशांनंतर पुस्तिका किंवा हस्तलिखित स्वरूपात असलेला वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे जुने लायसन्स अद्ययावत न केलेल्यांना 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यांच्या जिल्हा परिवहन कार्यालयात मूळ परवान्यासह ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. याबाबतचा आदेश परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओंना जारी केला आहे. अद्ययावतीकरणादरम्यान कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना मुदतवाढ देण्यात आली. परंतु आता पुन्हा मुदत वाढवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.