मार्गदर्शक व प्रेरणास्थान अॅड. संजयराव काळे

जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष ऍड. संजयराव शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंदाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.

आमच्या संस्थेचे भाग्य थोर असल्यामुळेच ऍड. संजयराव काळे यांच्यासारखे उच्चशिक्षित व शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व संस्थेस अध्यक्ष म्हणून लाभले. सन 2007 पासून संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा ते समर्थपणाने सांभाळत आहेत. त्यामुळेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे नाव केवळ सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या भौतिक आणि शैक्षणिक प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत आहे.

महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना दिलेले कामातील स्वातंत्र्य, चांगल्या कामाबद्दल नियमितपणे होणारे कौतुक व प्रोत्साहन यामुळे सर्वजण महाविद्यालयात जीव ओतून काम करतात. त्यामुळे महाविद्यालयास विद्यापीठ व राज्यस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यात नॅंककडून महाविद्यालयास मिळालेली ए ग्रेड, विद्यापीठाचा ग्रामीण विभागाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट एकक महाविद्यालय पुरस्कार तसेच उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार, उत्कृष्ठ नियतकालिक पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. ऍड. काळे साहेबांच्या व माननीय विश्वस्तांच्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या विकासाची घोडदौड अखंड चालू आहे.

सध्या महाविद्यालयात साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांतर्गत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय चालविले जाते. त्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासाक्रमाबरोबरच वाणिज्य व प्राणीशास्त्र या विषयांच्या संशोधन केंद्राचाही समावेश आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे महाविद्यालयास शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी भरीव आर्थिक मदत मिळाली आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नियमित अनुदानाव्यतिरिक्त सी. पी. ई (कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्‍सलन्स) या योजनेअंतर्गत भरीव अनुदान मिळाले आहे. या सर्व कामाच्या पाठपुराव्यासाठी ऍड. संजय काळे साहेबांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. संस्थेचे संस्थापक सहकारमहर्षी, माजी आमदार कै. शिवाजीराव तथा दादासाहेब काळे प्रशासकीय इमारतीमुळे महाविद्यालयाच्या वैभवात भर पडली आहे. यात ऍड. काळे साहेबांची कल्पकता व दृष्टिकोन कारणीभूत आहे. तसेच प्रशस्त इनडोअर गेम हॉलचे बांधकामही पूर्ण झाले आहे.

1970 साली स्थापन झालेल्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे संस्थापक सहकारमहर्षी श्री शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांच्या विचारांचा वसा व वारसा लाभलेले त्यांचे चिरंजीव ऍड. संजयराव काळे हे जुन्नर तालुक्‍याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ संचालक, अजितदादा पवार बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तसेच जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून करत असलेले काम जनतेसमोर आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या कल्पक कामांचा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयातील गरीब व हुशार मुलांना सवलत देऊन तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांनी त्यांची संवेदनशीलता दाखवून दिली आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे व त्यातून देशाची सुसंस्कृत व कर्तबगार पिढी उदयास आली पाहिजे, ही त्यांची अखंड तळमळ असते. अश्‍या या शिक्षणप्रेमी व कर्तबगार व्यक्तिमत्वास वाढदिवसानिमित्त मी महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च लाख लाख शुभेच्छा देत आहे.

* संकलन *
हितेंद्र गांधी, जुन्नर

* शब्दांकन *
डॉ. चंद्रकांत मंडलिक, प्रभारी प्राचार्य, श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर (पुणे)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.