- झेंडू पोहचला दीडशेपर्यंत; गुलछडी, शेवंतीच्या दरातही दुप्पट वाढ
पिंपरी – दसऱ्याला फुलांच्या दरांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी वाढ पहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे दिवाळीत देखील फुले महागणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. दिवाळीआधीच फुलांचे भाव वधारले असून झेंडू 150 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहचला आहे. गुलछडी, शेवंती या फुलांच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लक्ष्मीपूजनाला पुजेसाठी फुलांना विशेष मागणी असते. त्याशिवाय, दुकानाची पूजा, वाहनांची पुजा यासाठी देखील आवर्जून फुले विकत घेतली जातात. त्यातही झेंडू व शेवंतीच्या फुलांना विशेष मागणी असते.
यंदा पावसामुळे झेंडूच्या फुलांची आवक कमी प्रमाणात झाली आहे. त्यातही गुजरातसह इतर राज्यांमध्ये झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे. परराज्यात झेंडूची फुले पाठविण्यात येत असल्याने पिंपरी बाजारपेठेत फुलांची आवक कमी प्रमाणात झाली आहे. पर्यायाने, झेंडूच्या दरातही वाढ झाली आहे. झेंडू 60 ते 80 रुपये किलो दराने विकला जात होता. आता झेंडूचे दर 100 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहेत. कलकत्ता झेंडू 60 ते 80 रुपये किलो होता. त्याचे दर 140 ते 200 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचले आहेत.
गुलछडीचे दर 80 ते 100 रुपये किलोपर्यंत होते. त्याच्या दरात आता दुपटीहून आधिक वाढ झाली आहे. गुलछडीची फुले 250 ते 400 रुपये किलो या दराने विकली जात आहेत. शेवंतीच्या फुलाच्या दरातही दुपटीहून आधिक वाढ झाली आहे. 100 ते 120 रुपये किलो दराने विकली जाणारी शेवंतीची फुले सध्या 250 ते 400 रुपये किलो या दराने विकण्यात येत आहेत, अशी माहिती फुल विक्रेते गणेश आहेर यांनी दिली.
फुलांचे दर (प्रति किलो) : ऍस्टर (सुट्टा) – 200 ते 300, पिवळी शेवंती – 200 ते 300, सुट्टा गुलाब – 200 ते 250, गजरा बंडल – 150 ते 250, गुलाब गड्डी (साधी) – 30 ते 50, जरबेरा – 40 ते 60 रुपये गड्डी, डच गुलाब – 120 ते 200 रुपये गड्डी.
पुन्हा लढविणार तीच शक्कल
दसऱ्याला विक्रेत्यांनी फुले खूपच महागात विकली होती. बाजारात दरवर्षीप्रमाणे फुलांचे ढीग दिसत नव्हते. उच्चांकी दर असतानाही अत्याधिक नफ्यासाठी बहुतेक विक्रेत्यांनी फुलांऐवजी हार बनवून विकण्यास प्राधान्य दिले होते. दहा ते वीस रुपयांच्या फुलांचा हार बनवून शंभर ते दोनशे रुपयांना विकले होते. तीच शक्कल आता दिवाळीतही लढविली जात आहे. लक्ष्मीपूजनासाठी किरकोळ फुल विक्रेते घाऊक फुलबाजारातून फुले विकत घेऊन फुलांचे हार बनवून ठेवत आहेत.