नाणे मावळ -मावळ तालुक्यातील जनावरांना लंपी स्किन विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने जनावरांना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यात गाय, बैल, म्हैस अशी एकूण सुमारे 52 हजार जनावरे आहेत. त्यात प्रामुख्याने बैलांना लंपी स्किन आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. तर दूध उत्पादन क्षमता घटल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत बंदी असूनही काही हौशी शेतकऱ्यांनी आजही देशी खिल्लार जातीच्या बैलांना जीव लावून सांभाळले आहे. मात्र “लंपी स्किन’मुळे बैल आजारी पडू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
प्रतिकारशक्ती कमी असलेल्या जनावरांना लंपीची लागण होते. जनावरांत लक्षणे दिसताच सुरुवातीपासून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो औषधोपचार केल्यास प्रामुख्याने आजार बळावत नाही. व मृत्यूचे प्रमाण कमी करता येते. असे खासगी पशुवैद्य डॉ. गोरख जाधव यांनी सांगितले.
प्रामुख्याने जनावरांवर आढळणाऱ्या रक्त शोषणाऱ्या किडीमुळे हा आजार पसरतो. मागील वर्षी एप्रिल महिन्यात सर्वप्रथम हा आजार गडचिरोली जिल्ह्यात आढळला होता. ग्रंथीला सूज येणे, मागील पायाला व पोटाला सूज येणे, शरीरावरती दोन ते पाच से.मी.चे फोड येणे व त्यात पू होणे, ताप येणे, नाकातून डोळ्यातून पाणी वाहणे, चारा खाण्यास त्रास होणे. लागण झालेल्या जनावरांवर औषध उपचारासाठी सुमारे आठ ते दहा हजार रुपये खर्च होतो. तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही.
जनावर बरे होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत असल्याने गोठ्यातील अन्य जनावरांना याची बाधा होऊ नये. म्हणून खूप सावधपणे याची काळजी घ्यावी लागते, असे कामशेतचे शेतकरी सदाशिव शिंदे यांनी सांगितले.लंपीची लस देऊनही काही जनावरांमध्ये पुन्हा लक्षणे दिसत आहेत.
त्यामुळे लस कितपत उपयोगी आहे हे पाहावे लागेल. अजूनही या आजारावर कोणतेही शाश्वत औषध उपलब्ध नसल्याने अन्य जंतनाशक व प्रतिजैविक औषधांद्वारे उपचार करावे लागत आहेत, असे पशुवैद्य डॉ. सचिन आरोटे यांनी सांगितले. प्रशासनाकडून तालुक्यात 9 हजार लस उपलब्ध झाली आहे.
आणखी 5 हजार लस लवकरच उपलब्ध होईल. आत्तापर्यंत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाते व कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 हजार जनावरांना लस टोचली आहे. रोज रात्री उशिरापर्यंत लसीकरणाचे काम सुरू असते. या माध्यमातून आमचा संपूर्ण तालुक्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस आहे. असे पशुधन विकास अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे यांनी सांगितले.
या गावांत झाले लसीकरण
नाणे, कांब्रे, करंजगाव, ब्राह्मणवाडी, साबळेवाडी, मोरमारवाडी, गोवित्री, सावळा, पिंपरी, माळेगाव, (खुर्द व बुद्रुक), आडले, शिवणे आदी गावात लंपीचे लसीकरण झाले आहे.