मस्कत – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील यशानंतर भारतीय महिला हॉकी संघाने महिला आशिया हॉकी स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने चीनवर 2-0 अशी मात करत कांस्य पदकावर नाव कोरले. उपांत्य फेरीत कोरियाकडून पराभूत झाल्यानंतर भारताने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळविला.
या सामन्यात भारतीय महिला हॉकीपटूंनी सुरुवातीपासूनच उत्तम खेळ दाखवला. सुरुवातीला भारताने दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. ज्यातील एका कॉर्नवर शर्मिला देवीने 13व्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0ची आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने चीनवर दबाव निर्माण करत आक्रमक खेळ केला.
यानंतर 19व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने भारताच्या गुरजीतने शानदार गोल करत आघाडी 2-0 अशी केली. दुसरीकडे कर्णधार असणाऱ्या गोलकिपर सविता पुनियाने चीनची आक्रमण शिताफीने परतावून लावली. चीनने एका पेनल्टी कॉर्नरवर उत्तम प्रयत्न केला. पण हा प्रयत्न सविताने यशस्वीपणे सेव्ह केला.
दुसऱ्या हाल्फमध्ये चीनने अधिक प्रयत्न करत अनेक गोल करण्याच्या संधी मिळवल्या, पण सविताने खंबीर कामगिरी करत एकही गोल होऊ दिला नाही. यामुळे अखेर सामना भारताने 2-0च्या फरकाने जिंकत कांस्यपदकावर नाव कोरले.