जेरुसलेम – अमेरिकेचे संरक्षणमंत्री सॉइड ऑस्टिन हे इस्रायलच्या दौर् यावर गेले असून इस्रायलने आता हमास विरुद्धचे युद्ध गुंडाळावे, यासाठी ते आग्रह करण्याची शक्यता आहे. या युद्धाचे खूप विपरीत परिणाम पॅलेस्टिनी जनतेला भोगायला लागत असल्यामुळे अमेरिकेकडून हा आग्रह केला जाण्याची शक्यता आहे.
फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीसह इस्रायलचे काही जवळचे सहयोगी, गेल्या आठवड्याच्या शेवटी युद्धबंदीची मागणी करायलसा लागले आहेत. अन्य जागतिक पातळीवरून होत असलेल्या युद्धबंदीच्या मागणीला इस्रायलने आतापर्यंत धुडकावले होते. म्हणून इस्रायलचे मन वळवण्याचा प्रयत्न ऑस्टिन करणार असल्याचे बोलले जाते आहे.
इस्रायल जोपर्यंत हमासला सत्तेवरून हटवत नाही आणि हमासच्या लष्करी क्षमतेला चिरडत नाही तोपर्यंत ते लढत राहतील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिकेने इस्रायलला सर्वोतोपरी मदतच केली आहे. मात्र या युद्धामध्ये गाझामधील १८ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
गाझातील ८५ टक्के लोक दक्षिणेकडे पळून गेले आहेत. यापैकी बहुसंख्य लोकांना संयुक्त राष्ट्राच्या छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. अमेरिकेच्या आग्रहाने इस्रायलने मदत साहित्याचे प्रमाण वाढवण्यास अनुमती दिली. पण अजूनही मोठ्या भागात मदत पोचलेली नाही.
गाझाबरोबर वेस्ट बँकमध्येही ठिकठिकाणी धुमश्चक्री सुरू असून तेथे आतापर्यंत ३०० पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. इस्रायल आणि लेबेनानमध्ये जवळपास दररोज सीमेवर गोळीबार होतो आहे. सीरिया आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवरही हल्ले होत आहेत.
येमेनमधील बंडखोरांकडून लाल समुद्रातील जहाजांवरही हल्ले व्हायला लागले आहेत. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती आणकीन वाढण्याची भीती आहे. इस्रायलने आता हमासविरुद्ध नेमकी आणि प्रभावी कारवाई करावी, यासाठी ऑस्टिन आग्रह धरण्याची शक्यता आहे.