मुंबई – २०२३ मध्ये तिकीट खिडकीवर अमेरिका आणि चीननंतर भारतीय चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली. सर्व प्रमुख युरोपीय देशांपेक्षा देशी चित्रपटांचे कलेक्शन सर्वाधिक होते. यावर्षी चित्रपटांचा गल्ला वाढवण्यात हिंदी चित्रपटांचा सर्वाधिक वाटा ४३ टक्के होता. पॅन इंडिया चित्रपटांचा कल हा व्यवसाय वाढण्यामागे सर्वात मोठे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील चित्रपटांची वार्षिक कमाई २० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.
२०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘कोटा फॅक्टरी’नंतर बॉलीवूडला एज्युकेशनच्या रूपाने एक नवीन विषय मिळाला आहे. यानंतर क्रॅशकोर्स, सुपर ३० सारख्या चित्रपट आणि वेबसिरीजने शिक्षणाचे मुद्दे खूप चांगले मांडले आणि ते यशस्वीही झाले आहेत. नुकत्याच प्रदर्शित ‘१२वी फेल’मध्ये यूपीएससी इच्छुकांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ४० चित्रपट आणि वेबसिरीज आहेत, ज्यांचा मुख्य विषय शिक्षण आहे.
भारतात छोटे चित्रपटही यशस्वी होतात. तीन कोटी रुपयांमध्ये बनलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने ९० कोटींचा व्यवसाय केला होता. २०२३ मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या चित्रपटांत याला स्थान मिळाले. विधू विनोद चोप्रांच्या ‘१२वी फेल’या २० कोटीत बनलेल्या चित्रपटाने ६५ कोटीहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
चीन-अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर
सध्या मनोरंजन क्षेत्रात शिक्षणावर आधारित ५०% चित्रपट व मालिका गेल्या ५ वर्षांत बनवल्या गेल्या. २०१९ मध्ये, व्हाय चीट इंडिया, हाफ सीए, परीक्षा, सुपर ३०, छिछोरे यासह ६ चित्रपट/मालिका प्रदर्शित झाल्या. २०२३ मध्ये, १२वी फेल, एस्पिरंट्स सीझन २, एसके सर की क्लास, संदीप भय्या यासह ७ चित्रपट/मालिका प्रदर्शित झाल्या. समीक्षक अजय ब्रह्मत्मज म्हणाले, अभियंते व आयआयटीयन्स त्यांचा अनुभव कथेच्या रूपाने मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. त्यामुळे भारतीय सिनेमा चीन-अमेरिकेनंतर कमाईच्या बाबतीत आता तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.