खालापूर, (वार्ताहर) – शेकाप पक्ष रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणूकांना सामोरे जाईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि शेकाप पक्षाचे नेते सुरेश खैरे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खालापूर आणि कर्जत तालुक्यातील शेकाप पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक खोपोलीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आस्वाद पाटील, प्रदीप नाईक, गौतम पाटील, परेश देशमुख, किशोर पाटील, अविनाश तावडे, संतोष जंगम, कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, दिलीप पोरवाल, शांताराम पाटील, शिवानी जंगम, दिनेश गुरव उपस्थित होते.
शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बूथ कमिटया करणे, प्रत्येक गावात जाऊन लोकांपर्यंत पोहचणे, प्रत्येक बूथवरील पक्षाच्या मतदारांची संख्या कळावी यासाठी जिल्ह्यात प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठका घेतल्या जात असून खालापूर आणि कर्जत तालुक्यातील पदाधिकार्यांची बैठक घेऊन सूचना दिल्याचे सुरेश खैरे यांनी संगितले. बूथ अध्यक्षांचा मेळावा लवकरच आयोजित केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.