कराड – वारूंजी फाटा (ता. कराड) येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर काळवीटाची शिंगांची तस्करी करताना वन विभागाने चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून काळवीटाची चार शिंगे व चार मोबाइल हॅन्डसेट असा ऐवज हस्तगत करण्यात आला. जप्त शिंगे पाटण येथील चंद्रशेखर भिकाजी निकम (सेवानिवृत्त रेल्वे पोलीस) यांच्याकडून मिळाली असल्याचे संशयितांनी कबूल केले.
रत्नाकर हणमंत गायकवाड (वय 42, रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली), अमर भगवान खबाले (वय 35), इलाई सय्यद शेख (वय 50) व विशाल संभाजी शिंदे (वय 31, तिघे रा. कराड) यांना अटक करण्यात आली आहे. वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार दि. 12 रोजी वारूंजी फाटा येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर काळवीटाची शिंगे तस्करी करण्याच्या उद्देशाने दोघेजण आल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
त्यानुसार उपवनसंरक्षक (सातारा) श्रीमती आदिती भारव्दाज व सहायक वनसंरक्षक (वनीकरण) महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षेत्रपाल कराड, वनपाल वराडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या मौजे वारूंजी फाटा येथे सापळा रचला. काळवीटाची तस्करी करीत असताना रत्नाकर हणमंत गायकवाड व अमर भगवान खबाले यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता या तस्करीमध्ये अजून दोन व्यक्ती सामील असल्याचे समजले. त्यानुसार इलाई सय्यद शेख व विशाल संभाजी शिंदे यांनाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या संशयितांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
वनक्षेत्रपाल टी. डी. नवले (कराड), वनक्षेत्रपाल आर. एस. नलवडे (पाटण), वनपाल सागर कुंभार (वराडे), आनंदा जगताप (मलकापूर), बाबुराव कदम (कोळे), वनरक्षक सचिन खंडागळे (वराडे), शीतल पाटील (म्होप्रे), अभिजित शेळके, सुभाष गुरव (म्हासोली), शंकर राठोड (कोळे), कैलास सानप (मलकापूर) व इतर वन कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.