नवी दिल्ली – या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा भारतात खेळविली जात आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत असलेला हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, 15 ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान यांच्यात सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर होईल. त्याचबरोबर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने विश्वकरंडकाला प्रारंभ होणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेपॉक येथे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच विश्वकरंडकाची उपांत्य फेरी मुंबईत खेळवली जाऊ शकते.
विश्वकरंडकाचा अंतिम सामना सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळविण्याचे आयसीसीचे नियोजन असल्याचेही सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे. अधिक माहितीनुसार, आयसीसीने आगामी विश्वकरंडकाचे वेळापत्रक तयार केले असून, ते आयपीएलच्या समाप्तीनंतर जाहीर केले जाऊ शकते. आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादला खेळविण्याचा बीसीसीआयचा मनोदय असला तरी, आता पाकिस्तानने अहमदाबादमध्ये खेळण्यास आक्षेप घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत हा सामना हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरू या अन्य ठिकाणी हलवला जाऊ शकतो.
आठ संघांनी मिळवली पात्रता
एकदिवसीय विश्वकरंडक 2023 मध्ये विजेतेपदासाठी 10 संघांमध्ये लढत होणार आहे. यासाठी आठ संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. पात्रता फेरी खेळल्यानंतर आणखी दोन संघांचा त्यामध्ये समावेश होणार आहे. स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जातील. ज्यामध्ये प्रत्येक संघ सुमारे 9-9 सामने खेळेल.
यजमान भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. झिम्बाब्वेमध्ये 18 जून ते 9 जुलै या कालावधीत पात्रता स्पर्धेद्वारे शेवटचे दोन संघ निवडले जातील. ज्यामध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडीज व्यतिरिक्त झिम्बाब्वे, नेदरलॅंड, ओमान, यूएई, आयर्लंड, नेपाळ, स्कॉटलंड आणि अमेरिका या संघांचा समावेश असेल.