नवी दिल्ली – नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी कॅमेराच्या टेहळणीविना एकांतात भेट घेऊ देण्यास पाकिस्तान तयार नाही. त्यामुळे तशी परवानगी मिळावी म्हणून भारत आता पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात कायदेशीर लढा देण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी पाकिस्तानने भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांना जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, यावेळी त्यांनी जाधव यांची एकांतात भेट घेता येणार नाही अशी अट घातली होती. मात्र, तो प्रस्ताव भारताने धुडकावून लावला होता. त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. कॅमेरा तसेच संभाषण ध्वनिमुद्रित करणारे उपकरण न बसविलेल्या ठिकाणी एकांतात जाधव यांची भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांना भेट घेण्याची पाकिस्तानने परवानगी द्यावी यासाठी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय निकषानुसार सर्व देशांतील तुरुंगात आता कॅमेरे व ऑडिओ रेकॉर्डिंग उपकरणे बसविण्यात आली आहेत, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून होण्याची शक्यता आहे.