बर्मिंगहॅम – ऍशेस मालिकेतील पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतक करीन हे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यामुळेच मला या कामगिरीचे आश्चर्य वाटत आहे असे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने सांगितले.
इंग्लंडविरूद्ध येथे सुरू असलेल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 144 धावा तर दुसऱ्या डावात 142 धावा केल्या. या कामगिरीबाबत स्मिथ म्हणाला की, माझ्याकडे चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मात्र ज्या परिस्थितीत ही शतके झाली, तशी शतके माझ्याकडून होतील याची मला खात्री नव्हती. यापूर्वी माझ्याकडून कधीच अशी कामगिरी झालेली नाही.
पहिल्या डावात आमच्या संघास सावरण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ही जबाबदारी पार पडण्यासाठीच मी खेळलो आणि माझ्याकडून शतक झाले. पहिल्या डावात आम्ही पिछाडीवर पडलो होतो. इंग्लंडपुढे मोठे लक्ष्य ठेवण्याबरोबरच आव्हानात्मक धावसंख्या रचणेही आवश्यक होते. ही दोन्ही ध्येये साकार झाल्यामुळे मी समाधानी आहे.
मॅथ्यु वेडने केलेल्या शतकाचे कौतुक करीत स्मिथ म्हणाला की, मॅथ्युची खेळी सहजसुंदर झाली. त्याने दिलेल्या साथीमुळेच माझे शतक झाले. हे शतक पूर्ण होण्यापूर्वी आम्ही सतत एकमेकांना प्रोत्साहन देत होतो. आमच्यामध्ये चांगला सुसंवाद असल्यामुळेच ही कामगिरी फत्ते झाली.
इंग्लंड संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रॅहॅम थॉर्पे यांनी स्मिथच्या शतकांबद्दल गौरवोदगार व्यक्त करीत सांगितले की, स्मिथ हा अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याची शैली त्याच्याकडे आहे हे त्याने अनेक वेळा सिद्ध केले आहे. त्याची फटकेबाजी नेहमीच कलात्मक असते आणि प्रेक्षक त्याचा नि:खळ आनंद घेत असतात.