सातारा -जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब असून सातारा तालुक्याचा आकडा 14 वर गेला आहे. सातारा नगरपालिका आणि शाहूपुरी ग्रामपंचायत यांच्या सीमेवर असलेल्या गेंडामाळ नाका परिसरात एक बाधित रुग्ण सापडल्याने शाहूपुरीकरांची धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शाहूपुरीमध्ये दक्षता घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दुपारपर्यंत बाधित रुग्णांचा आकडा 112 पर्यंत पोहचला. यातील सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात असून सातारा शहर आणि तालुक्यात 14 रुग्ण आहेत. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनासाठी डोकेदुखी बनत आहे. सातारा आणि शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीवर गेंडामाळ नाका परिसरात एक बाधित महिला सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या परिसरात प्रशासन दक्ष झाले असले तरी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळवून अतिनिकट सहवासातील लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करणे गरजेचे आहे. गेंडामाळ नाका परिसरात बाधित रुग्ण सापडल्याने लगतच्या शाहूपुरीकरांना त्याचा चांगलाच धक्का बसला आहे.
गेंडामाळ नाक्यापासून शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 40 हजार लोक वास्तव्य करत आहेत. दिवसेंदिवस या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. त्या तुलनेत या परिसरातील नागरिकांना आरोग्याशी निगडीत सोयीसुविधा उपलब्ध होताना दिसत नाहीत. आता तर करोना वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शाहूपुरीतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व ग्रामपंचायतीच्यावतीने याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेंडामाळ नाका येथे सापडलेल्या रुग्णाशी संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळवून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून ही साखळी संपुष्टात आणणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली करण्याची गरज आहे.
शाहूपुरीत आज सॅनेटायझर फवारणी
सातारा नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असलेल्या गेंडामाळ नाका परिसरात करोनाबाधित महिला आढळल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत सतर्क झाली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी दि. 8 मे रोजी गेंडामाळ नाका परिसरात सॅनेटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत आत्तापर्यंत प्रत्येक वार्डात दोन वेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी घरोघरी पत्रके वाटण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांनी केले.