प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता 4 रुपयांनी भाडेवाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इंधन दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत भाडेवाढीची मागणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे केली होती.
भाडेवाढीसाठी त्यांनी प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनदेखील केले होते. त्यांच्या मागणीला आता यश आले असून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दि. 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ करण्याला मान्यता दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती परिसरात ही भाडेवाढ लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 25 रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहेत. पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारणी करता येत होते. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते.
मीटर पुनःप्रमाणीकरण आवश्यक
नवीन भाडेवाढीनुसार आता रिक्षांना मीटर पुनःप्रमाणीकरण करणे आवश्यक असले. तसे करणाऱ्या रिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुनः प्रमाणीकरण करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेणार नाहीत, त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा किमान 50 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.
पहिल्या 1 कि.मी.साठी 25 रुपये दर
त्यानंतर प्रत्येक
कि.मी. साठी 17 रुपये
पुणे, पिंपरी चिंचवड, बारामतीसाठी निर्णय
नोंदणीकृत रिक्षाचालक संख्या
पुणे शहर – 82,523
पिंपरी चिंचवड – 24,770
बारामती – 1,829
सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा संघटनांनी रिक्षा दरवाढीची मागणी केली होती. यासदर्भात खटुआ समितीची स्थापना केली होती. त्याच्या शिफारशीचा विचार करून आणि समाजातील सर्व घटकांना विचारात घेऊन रिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे.
– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी