नवी दिल्ली – देशभरातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी 91 एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा अशा 7 ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
नागरिकांना खास भेट देण्याचा प्रयत्न…
या लोकार्पणप्रसंगी प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, ‘ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा शुभारंभ म्हणजे देशातील 85 जिल्ह्यांतील 2 कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले. रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.
आजचा ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार एक महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळून हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
तसेच माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील’. असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.