पुणे : दुचाकीवरून जाताना गाडीस धक्का देऊन शिवीगाळ करत लुटणाऱ्या तिघांना गुन्हा घडल्याच्या आठ वर्षानंतर एक वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. प्रसाद अशोक शेडगे, प्रमोद सुरेश कदम, साहील संजय शिंदे (तिघेही रा. पर्वती दर्शन) अशी तिघांची नावे असून सक्तमजुरीसह प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ही जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयाने सुनावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही निकालात म्हटले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ऍड. प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले.16 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पर्वती येथील वेलणकर रस्त्यावर हा प्रकार घडला. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. दुचाकीवरून जात असताना गाडीस धक्का देऊन शिवीगाळ व मारहाण करून मोबाईल व रोख रोकड असा 9 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.